माध्यमिक विभागात, इ. 7वी, 8वीच्या टप्प्यावर मुलांना स्वयं-अध्ययनाचा आत्मविश्वास आलेला असतो. त्यामुळे अभिव्यक्ती आणि सादरीकरणाच्या कौशल्यावर भर दिला जातो. या स्वयं-शिक्षणात गटामध्ये आपल्या मित्रांकडून शिकणे, वर्गामध्ये एखादा घटक मुलांनी शिकविणे, स्वयं-अध्ययन इ. विविध तंत्रांचा वापर माध्यमिक विभागात केला जातो. विद्यार्थी स्वतंत्रपणे वैयक्तिक अभ्यासपूर्ण प्रकल्प सादर करतात. विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा परिचय, क्षेत्रभेटी अशा माध्यमांतून मुलांसमोर करिअरचे वेगवेगळे पर्याय ठेवले जातात. नुसतच शिकवणं नाहीतर मुलांच्या व्यक्तिमत्वाची जोपासना, सकारात्मक मनोविकास आणि जडणघडण यावर जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित केले जाते.
दरवर्षी इ. 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यासाठी एका आठवडयाचे निवासी मातृभूमी परिचय शिबिर आयोजित केले जाते. इ. 8वीचा वर्ग या शिबिरांचे आयोजन, नियोजन आणि व्यवस्थापन करतो. इ. 9वीच्या विद्यार्थ्यांचे सायकल शिबिर आयोजित केले जाते. या शिबिरात रोज मुले साधारणपणे 90 किलोमीटर इतका प्रवास सायकलने करतात. मुक्कामाच्या ठिकाणी तंबू बांधून स्वतःच तयार केलेल्या भोजनाचा आनंद घेतात. निसर्गाच्या सान्निध्यात मुले मुक्तपणे राहतात. गड-किल्ल्यांचा अभ्यास करतात, ट्रेकिंगचाही अनुभव घेतात. त्या ठिकाणचे लोक, संस्कृती, राहणीमान, हवामान, इतिहास, भौगोलिक परिसर इ.ची माहिती घेतात.
आजचा विद्यार्थी हा उद्याचा आदर्श नागरिक बनविण्यासाठी आत्तापासून त्यांच्या मनामध्ये देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हावी आणि आपल्यावर अनंत उपकार करणाऱ्या भूमातेची आठवण प्रत्यक्ष पूजनाने व्हावी व समाजामध्ये देशभक्ती निर्माण व्हावी यासाठी गुरुकुलाचे विद्यार्थी वांगणी-बदलापूर-अंबरनाथ येथील विविध विभागात ‘भारतमाता पूजन’ सोहळा प्रजासत्ताक दिनी सादर करतात. या कार्यक्रम ‘शून्य’ खर्चात केला जातो. कार्यक्रमासाठी लागणारे सर्व साहित्य समाजातून, स्थानिक नागरिकांकडून मिळविले जाते. सामाजिक उपक्रमासाठी काही मागतांना भीड बाळगूू नये हा या उपक्रमामागचा प्रमुख हेतू.
अभ्यास जत्रा म्हणजे वर्गात अभ्यास आणि वर्गाच्या बाहेर आणि शाळेच्या आवारात ‘जत्रा’. वर्गात मुलांनी आपल्या परीक्षेला नेमलेला अभ्यास विषय जत्रेला आलेल्या पालकांना सजमावून सांगण्याच्या प्रयत्नातून आपली परीक्षेची तयारी करायची हा मुख्य भाग आणि पालकांनी, माजी विद्यार्थ्यांनी आणि परिसरातील शाळांनी जत्रेप्रमाणे विविध शैक्षणिक आकर्षणे मांडून शाळेत आनंददायक वातावरण निर्माण करायचे हा दुसरा भाग. अभ्यासजत्रेमुळे परीक्षेची भीती दूर होते, कठीण वाटणारा विषय घटक पक्का होतो, नैसर्गिक प्रवृत्ती जागृत होते, आत्मविश्वास निर्माण होतो, सभाधीटपणा येतो आणि भाषाकौशल्य विकसित होते. इ. 5वी ते 10वीचे विद्यार्थी गणित, विज्ञानाचे घटक इंग्रजीतूनदेखील उत्तमरित्या मांडतात
विद्यारंभ: इ. 5वी तील विद्यार्थ्यासाठी ‘विद्यारंभ’ हा ‘संस्कार’ आहेे.
विद्याव्रत: इ. 8वी तील विद्यार्थी त्यांचे आयुष्यातील ध्येय निश्चित करतात आणि अग्नीदेवतेसमोर ध्येय निश्चितीचा संकल्प करतात. ‘विद्याव्रत’ हा संस्कार आहेे. विद्यार्थ्यांचे पालकही या संस्कारात सहभागी होतात.
शिवराज्यभिषेक दिनः ज्येष्ठ शुध्द त्रयोदशीला शिवराज्यभिषेक दिन साजरा केला जातो. शिवराज्यभिषेक दिन सोहळयाच्या निमित्ताने इ. 5वी ते 10वीचे विद्यार्थी शिवचरित्रावर व्याख्याने, पोवाडे इ. कार्यक्रम सादर करतात.
कालिदास दिनः आषाढ़ाच्या पहिल्या दिवशी कालिदास दिन साजरा करण्यात येतो. विद्यार्थी संस्कृतमधून छोटया नाटिका, कथा, गीते, विनोद सादर करतात.
राखीपौर्णिमाः सामाजिक बांधिलकीचे मूल्य रुजविण्यासाठी राखीपौर्णिमेच्या दिवशी इ. 5वी ते 10वीची मुले हाॅस्पिटल, पोलिस स्टेशन, अग्निशमन दल, बॅंक, पोस्ट आॅफीस अशा ठिकाणी जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना राखी बांधतात.ते आपल्याला देत असलेल्या सेवेबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतात. राखीपौर्णिमेच्या निमित्ताने वृध्दाश्रमात जाऊन तेथील आजी-आजोबांशी सवांद साधतात.
स्वातंत्र्य दिनः दरवर्षी 15 आॅगस्ट रोजी ‘स्वातंन्न्य दिन’ साजरा केला जातो. शालांत परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांला ध्वजारोहणाचा बहुमान दिला जातो.
निबंध, वक्तृत्व आणि निवेदन कार्यशाळाः जून, जुलै आणि आॅगस्ट मध्ये इ. 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यासाठी निबंध, वक्तृत्व आणि निवेदन कार्यशाळेची साखळी आयोजित केली जाते. तज्ञ मंडळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. या विषयातील विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करण्याचा यशस्वी प्रयत्न केला जातो. स्पर्धा घेऊन मुलांना बक्षिसे देण्यात येतात.
प्रजासत्ताक दिनः दरवर्षी 26 जानेवारी रोजी ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जातो. राष्ट्रीय स्तरावर यशस्वी झालेल्या क्रीडापटूला ध्वजारोहणाचा बहुमान दिला जातो. विद्यार्थी कवायत, परेड, एरोबिक्स आणि लेझीमची प्रात्यक्षिके सादर करतात.
भाषासमृध्दीः इ. 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम असतो. इ. 1ली, 2रीतील मुले याला गप्पा-गोष्टीचा तास म्हणतात. मुलांना आपण गोष्टी, व्याख्याने, एकपात्री प्रयोग, कविता प्रामुख्याने ‘ऐकवतो’. तसेच त्यांना माणसे, निसर्ग, संस्कृती, नाटक, चित्रपट, चित्र-शिल्प अशा कलाकृती कशा वाच्याव्यात आणि बघाव्यात हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. भाषेचे कोणतेही बंधन न ठेवता मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या सर्व भाषांमधील साहित्य मुलांसमोर ठेवले जाते.
यावर्षी ‘जर्मन’ सारख्या परदेशी भाषेबद्दल इ. 8वी, 9वीच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने मुंबई विद्यापीठाच्या ‘जर्मन’ भाषां विभागाच्या प्रतिनिधींनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
विज्ञान प्रदर्शनः दरवर्षी दि. 28 फेब्रुवारी रोजी विज्ञान दिनाच्या निमित्ताने विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जातेे. संपूर्ण शाळेतील सर्व विद्यार्थी प्रदर्शनात सहभागी होतात. तीन विद्यार्थ्यांच्या गटांमधून कमीत कमी तीन खेळणी किंवा प्रयोग सादर करण्यात येतात. विद्यार्थी इंग्रजी किंवा मराठीतून वैज्ञानिक तत्वे पालकांना समजावून सांगतात.