@@INCLUDE-HTTPS-REDIRECT-METATAG@@ क्रीडा विभाग

क्रीडा विभाग

सूर्यनमस्कार आणि योगासने आणि उपासना:

भारतीय संस्कृतीचा गुरुकुल शिक्षण पध्दती हा अविभाज्य भाग. सूर्यनमस्कार, योगासने आणि उपासना ही गुरुकुलाची ओळख.

गुरुकुलाच्या पहिल्या सत्राची सुरुवात ही सूर्यनमस्कार, योगासने आणि उपासनेने होते. चित्तवृत्ती स्थिर आणि शांत व संयमी होण्यासाठी या सकाळच्या सत्राचे प्रयोजन.

सायंमैदान:

जीवनात अखंड गतिमान राहण्यासाठी, धाडसी वृत्ती आणि निर्णयक्षमता वाढविण्यासाठी, नव्या आव्हानांचा स्वीकार, जबाबदाऱ्या पेलण्यासाठी गुरुकुलात संध्याकाळच्या सत्रात (सायं. 5.00 ते 6.45वा.) वेळात विविध वैयक्तिक आणि सांघिक खेळ घेतले जातात. सायकलिंग, स्विमिंग, अॅथलेटीक्स, बुध्दिबळ, ट्रायथलाॅन, मल्लखांब असे वेगवेगळे वैयक्तिक खेळ मुले खेळतात. नित्य नियमाच्या सरावाने स्वतःशीच स्पर्धा करतात. तसेच नेटबाॅल, थ्रोबाॅल, लंगडी, जम्प रोप, खोखो असे सांघिक खेळ खेळले जातात. या खेळातून सांघिक भावना वाढीस लागते, खिलाडूवृत्तीची जोपासना होते.

लेझीम पथक (योगचाप):

लेझीम हा महाराष्ट्राचा लोकप्रिय मर्दानी खेळ! महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जतन करत तालबध्द हालचालींच्या माध्यमातून शारिरीक सुदृढतेचा दृष्टिकोन डोळयासमोर ठेवून लेझीम पथक कार्यरत आहे. इ.5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांचे दिमाखदार लेझीम पथक गुढीपाडव्याची शोभयात्रा, हनुमान जयंती, रामनवमी, गणपती विसर्जन यासारख्या मिरवणुकांमध्ये ‘निमंत्रित’ म्हणून मानाने सहभागी होते.

घोष पथकः

इ.8वी ,9वीच्या विद्यार्थ्यांचे उत्कृष्ठ संचलनाकरिता पारंपारिक वाद्यवादनावर घोष पथक तयार करण्यात येत आहे.

पोहणे:

पोहणे हा सर्वांगसुंदर व्यायामप्रकार आहे. त्यामध्ये बाह्यांगाबरोबर अंतरंगाचाही उत्तम व्यायाम होतो. त्यामुळे अनेक व्याधी दूर होतात. शरीर काटक, लवचिक व सक्षम होण्यास मदत होते. संस्थेच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर तरणरतलाव आणि क्रीडासंकुलात गुरुकुलातील पूर्व प्राथमिक ते 10वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पोहण्याची सुविधा दिली जाते किंबहुना गुरुकुलामध्ये पोहणे सक्तीचे आहे.